आज 15 जुलै अर्थात कब्बडी दिन..!!
कब्बडी या मातीतल्या खेळाची एक सामाजिक कार्यकर्ता या पेक्षा माझी एक खेळाडू म्हणून अधिक बांधिलकी आहे.
पारंपरिक 'हुतुतू' या 9 खेळाडूंच्या खेळाचे आणि 7 खेळाडूंच्या 'कब्बडी' समवेत सांगड घालून भारतातील मातीतल्या खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते कब्बडी महर्षी स्व. शंकरराव उर्फ बुवा साळवी यांच्या जन्मदिवसानिमित्त 15 जुलै हा कब्बडी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह देशात उत्साहात साजरा होतो.
विद्यार्थी दशेपासून मला कब्बडी खेळाचे मनस्वी आकर्षण होते. माझी जडणघडण ज्या पिंपळे निलख परिसरात झाली. तिथे मैदानी खेळांसाठी अनुकूल वातावरण असल्याने साहजिकच मी कबड्डी खेळाकडे वळालो. सुरुवातीला श्री छत्रपती संघ आणि नंतर पुण्यातील महाराणा प्रताप कबड्डी संघाकडून अनेक जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून खेळण्याची संधी मला मिळाली आणि त्या बहुतेक स्पर्धांमध्ये आमच्या संघाने विजेतेपद मिळवले. महाराणा प्रताप संघातील माझा समावेश हा खऱ्या अर्थाने माझ्या क्रीडा कारकिर्दीला गती देणारा ठरला. महाराणा प्रताप संघात मला अर्जुन पुरस्कार विजेते श्री. शांताराम जाधव सर तसेच महाराणा प्रताप संघाचे संस्थापक आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री. शरद (अण्णा) चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
कॉलेज जीवनात, मला 1997-1998 साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज चा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. फर्ग्युसन कॉलेज मधून, खेळताना आंतरमहाविद्यालयीन कब्बडी चॅम्पियनशिप माझ्या नेतृत्वाखाली मिळाली ह्याचा मनस्वी आनंद आहे. त्याचदरम्यान, दुबई येथे 2000 साली झालेल्या दुबई इंटरनॅशनल कब्बडी टूर्लामेंट मी बँक ऑफ महाराष्ट्र संघाकडून सहभाग घेतला आणि आमचा संघ विजेता ठरला आणि या विजेत्या संघाचा सदस्य असल्याचा सार्थ अभिमान आहे. पुढे राष्ट्रीय पातळीवर पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना सलग तीन वर्षे राष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये खेळाडू म्हणून सहभागी झालो.
कालांतराने, समाजकारण, राजकारणात सक्रिय झाल्यानंतर देखील, कब्बडी बद्दलची बांधिलकी कायम ठेवत युवकांसाठी कब्बडी स्पर्धा आयोजित केल्या. याद्वारे मनोभावे, कब्बडीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केला.
प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात जसे चढ-उतार येतात तसे, माझ्या देखील जीवनात आले पण, माझ्या मधील 'स्पोर्टिंग स्पिरीट' हे मी एक खेळाडू असल्याने नेहमीच पाठीशी राहिले. कब्बडी मुळे प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात विचलीत न होता स्थितप्रज्ञ होण्याची शक्ती मला मिळाली. कब्बडी खेळताना कोणताही जात, धर्म, पंथ आड येत नाही. कब्बडीच्या मैदानात प्रत्येकजण फक्त खेळाडूच असतो आणि फक्त जो चांगला खेळतो, कर्तृत्व गाजवतो तोच श्रेष्ठ असतो ही शिकवण कब्बडी खेळाच्या द्वारे आपणास नक्कीच आत्मसात करता येईल.
आज, स्व. बुवा साळवींनी केलेले भगीरथ प्रयत्न खऱ्या अर्थाने सफल होताना दिसत आहेत. 'प्रो-कब्बडी' सारख्या स्पर्धांमुळे कब्बडी खेळ आणि खेळाडू यांना पैसे, प्रसिद्धी मिळत आहे. जागतिक स्पर्धांमध्ये देखील भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत भारताचा नावलौकिक वाढवत आहेत. अनेक युवा खेळाडू, कब्बडी खेळण्यासाठी पुढे येत असून हे चित्र एक खेळाडू म्हणून मला नक्कीच सुखावते.
मात्र अजून आपले मातीमधील खेळ येणाऱ्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः शहरात जिथे मुले मोबाईल, डिजिटल गॅजेट्सच्या अधिक आहारी गेली असताना आपल्या सर्वांचीच सामाजिक जबाबदारी अधिक वाढते.
एक सामाजिक क्षेत्रात काम करणारा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी येणाऱ्या काळात या मोबाईल आणि डिजिटल गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला पुन्हा मैदानात आणण्यासाठी भरीव प्रयत्न करणार हा या कब्बडी दिनाच्या निमित्ताने माझा संकल्प आहे.
कब्बडी खेळणाऱ्या व कब्बडीवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात सर्वांना कब्बडी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!
आपला
सचिन मुरलीधर साठे